पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद; शुक्रवारी कमी दाबाने पाणी येणार

0
IMG_20260414_131949.jpg

पुणे : शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत पुणे महानगरपालिका प्रशासनाने गुरुवार (दि. १६ एप्रिल) रोजी संपूर्ण पुण्यात पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. विविध जलशुद्धीकरण केंद्रे व पंपिंग स्टेशनमध्ये तातडीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवार मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये नवीन व जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, खडकवासला जॅकवेल, वारजे, वडगाव आणि लष्कर जलकेंद्र येथे विद्युत, पंपिंग व स्थापत्य दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

या कामांमुळे शहरातील बहुतांश भागांना पाणीपुरवठा होणार नसून पर्वती जलसाठा क्षेत्रातील सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, कोंढवा या भागांवर थेट परिणाम होणार आहे. तसेच हडपसर, मुंढवा, मांजरी, फुरसुंगी, खराडी, चंदननगर, विमाननगर, विश्रांतवाडी, लोहगाव या पूर्व भागांनाही पाण्याअभावी फटका बसणार आहे.

पश्चिम भागातील कोथरूड, बावधन, वारजे, बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण आणि सुस रोड परिसरातही पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, तसेच पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply