पुणे, प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेतील अधीक्षक अभियंता असित जाधव यांना आयुक्त नवलकिशोर राम यांना कथित आक्षेपार्ह संदेश पाठवल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले. बदली रद्द करून पूर्वीच्याच विभागात कायम राहण्याचा प्रयत्न त्यांच्यावर उलटल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
महापालिका प्रशासनाने नुकतीच जाधव यांची पथ विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली केली होती. मात्र, बदलीनंतर त्यांनी नव्या विभागात रुजू न होता बदली रद्द करण्यासाठी थेट आयुक्तांना कथित आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचे समोर आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्तांनी शनिवारी (११ जुलै) रात्रीच त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.
सुटीच्या दिवशी इतक्या तत्परतेने करण्यात आलेल्या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कठोर कारवाई झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिकेतील बदली प्रक्रिया, शिस्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवादाची मर्यादा याबाबतही प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाने शिस्तभंगाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून दिल्याची चर्चा आहे.