सिंहगड रोड,पुणे दि १४जुलै: सिंहगड रोडवरील पानमळा ते पु.ल.देशपांडे उद्यान परिसरातील भाजीबाजारामुळे दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजी खरेदीसाठी येणारे काही नागरिक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून खरेदी करत असल्याने या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
याशिवाय काही भाजी विक्रेत्यांनी फूटपाथवर व्यवसाय थाटल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण पडत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येकडे संबंधित यंत्रणांनी नियमितपणे लक्ष देऊन वाहतूक व्यवस्थापन, फूटपाथ मोकळे करणे आणि बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचा अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिस यांनी समन्वयाने कारवाई केल्यास या परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात वाहतुकीचा ताण आणखी वाढत असल्याने संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी या प्रश्नावर वेळेत लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.




— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४