विसर्जनातील डीजे थांबवा; ‘आमच्या घरात दोन दिवस राहा’ – रहिवाशांचा इशारा

n63082541817263831425416e1ca7b5c7d45d9216940903dfc9e8cdffd476cfdc58d6c3b39b8320313237b4.jpg

पुणे: गणपती विसर्जन हा पुणेकरांसाठी आनंदाचा आणि भावनिक क्षण असला तरी शहरातील काही भागांतील रहिवाशांसाठी हा अनुभव अत्यंत त्रासदायक ठरत आहे. विशेषतः टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, आणि केळकर रस्ता परिसरातील नागरिक डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे त्रस्त आहेत. विसर्जन मिरवणुकीत वाजवल्या जाणाऱ्या डीजेच्या दणदणाटामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि प्राणीही धास्तावतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

“विसर्जन मिरवणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी आमच्या घरात दोन दिवस राहून पाहावे, त्यांना या त्रासाची जाणीव होईल,” अशी संतप्त प्रतिक्रिया केळकर रस्ता परिसरातील प्रदीप खरे यांनी दिली. त्यांच्या मते, पारंपरिक उत्सव साजरा करताना डीजेचा अतिरेक टाळण्याची गरज आहे.

रहिवाशांच्या या तक्रारींमुळे मिरवणुकीत होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाबाबत स्पष्ट आदेश दिले असले तरी, मिरवणुकीत त्यांचे उल्लंघन होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी आवाज 103 डेसिबलपर्यंत नोंदवला गेला, असे सुभाषनगर परिसरातील विनायक धारणे यांनी सांगितले.

स्थानिक प्रशासनाकडून या समस्येकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे.

Spread the love