पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळांना आज सुट्टी
पुणे, 25 सप्टेंबर 2024: भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 सप्टेंबर 2024 रोजी पुणे जिल्ह्यात विजेच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज तात्काळ आदेश काढून, हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अंतर्गत त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला आहे. तथापि, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना त्यांच्या शाळांमध्ये उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा प्रशासनाने तात्काळ या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.