पुणे: तीन लाखांची लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक बडतर्फ
पुणे : महावितरणच्या अधिकाऱ्यावर दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात या उपनिरीक्षकावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महावितरणमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला त्याच्यावर मीटर चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती देऊन या गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. तानाजी सर्जेराव शेगर असे बडतर्फीची कारवाई करण्यात आलेल्या लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी ४० वर्षीय अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे महावितरण विभागात नोकरीला आहेत. तक्रारदाराविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात मीटर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती उपनिरीक्षक शेगर यांनी त्यांना फोन करून दिली. या गुन्ह्याचा तपास ते स्वतः करीत असून या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराविरोधात कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. या संदर्भात तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची १० मे रोजी पडताळणी करण्यात आली होती. त्यामध्ये उपनिरीक्षक शेगर हा लाच मागत असल्याचे समोर आले. दरम्यान तडजोडीत त्यांनी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पंचांसमक्ष सिद्ध झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली होती.
लाचखोर पोलीस उपनिरीक्षक तानाजी सर्जेराव शेगर याला पोलीस खात्यातून काढून टाकण्यात आले आहे. शेगर यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात तीन लाख रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तानाजी शेगर पुणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत चंदननगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेगर यांना १९ मे रोजी निलंबित करण्यात आले होते. हडपसर विभागाच्या साहाय्यक आयुक्त यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली होती. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात वेळोवेळी समजपत्र बजावण्यात आले. मात्र, जेव्हा समजपत्र घेऊन कर्मचारी गेला तेव्हा शेगर हे घरी उपस्थित नव्हते. त्यामुळे एकतर्फी चौकशी करण्यात आली. त्यामध्ये ते दोषी आढळले. त्याशिवाय त्यांच्याकडील महावितरणसंबंधी गुन्ह्याच्या तपासात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व घटनांमुळे शेगर यांच्या वर्तणुकीमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पोलीस खात्यातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.