पुणे: पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांची आत्महत्या; लोणावळ्यात टायगर पॉईंट येथे मृतदेह आढळला

पुणे: पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ (वय __) हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा कुटुंबीय आणि पोलिसांकडून शोध सुरू असतानाच शुक्रवारी (ता. 7) लोणावळ्यातील टायगर पॉईंट परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या तीन दिवसांपासून ड्युटीवर नव्हते, कुटुंबीयांचा संपर्कही तुटला
अण्णा गुंजाळ हे गेल्या तीन दिवसांपासून ड्युटीवर हजर नव्हते. त्यांचा फोनही सतत नॉट रिचेबल येत असल्याने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला होता. अखेर पोलिसांना ११२ हेल्पलाइनवर एका अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला.
शिवदुर्ग मित्र पथकाच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस आणि शिवदुर्ग मित्र रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने गुंजाळ यांचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. घटनास्थळी त्यांची एक क्रेटा कारही आढळली.
आत्महत्येचं कारण अद्याप गुलदस्त्यात
अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या का केली, याबाबत कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही. कार्यालयीन तणाव, कौटुंबिक अडचणी किंवा इतर कोणतेही कारण यामागे असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू असून, लवकरच यामागील सत्य उघड होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण नेमके काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.