पुणे : येरवड्यात रस्ता खचला, डांबरीकरण अर्धवट; नागरिक त्रस्त; सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी: तातडीने रस्ता दुरुस्ती करा – व्हिडिओ

पुणे : येरवड्यातील मेट्रो स्थानकाजवळचा रस्ता खचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिकेकडून केलेले अर्धवट डांबरीकरण आणि तयार झालेला उंचवटा हे अपघातांना निमंत्रण देत आहेत. नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
कटारिया रुग्णालय आणि प्रिन्स हॉटेलजवळ पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. उंचवट्यामुळे वाहनांना हादरे बसत असल्याने दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सकाळच्या वेळी महिलांसोबत अनेक अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या समस्येमुळे वाहनचालकांच्या मणक्याच्या आजारांची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
पहा व्हिडिओ
येथील रहिवाशांनी या रस्त्याच्या अडचणींबाबत महापालिकेकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते यांनी या उंचवट्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही चालताना अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले.
या समस्येबाबत संपर्क साधला असता, कनिष्ठ अभियंता अक्षय मोडवे यांनी निवडणुकीनंतर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होईल असे सांगितले. मात्र नागरिकांनी ही दुरुस्ती तातडीने करण्याचा आग्रह धरला आहे. योग्य डांबरीकरण करून रस्ता समपातळीत करण्यात यावा आणि उंचवटा काढण्यात यावा, अशी ठाम मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.