पुणे: पदोन्नती नको तर जबाबदारीही नाही; आता बदली निश्चित: वरिष्ठांचे आदेश स्पष्ट

n6616298131746252362130767b8c2da6b2ddc4316835a2804be3776646538e97d47f821ccf29b0ca0bedc7.jpg

पुणे – पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि अंमलदार पदोन्नतीसाठी पात्र असतानाही ती जाणीवपूर्वक नाकारत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत वरिष्ठ पातळीवरून कठोर पावले उचलली जात आहेत. पदोन्नती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना आता अकार्यकारी पदावर बदली करण्यात येणार असून, संबंधित घटकप्रमुखांना त्याची जबाबदारी घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या दोन वर्षांत म्हणजेच 2022-23 आणि 2023-24 या कालावधीत सुमारे 75 पोलीस निरीक्षकांनी सहाय्यक पोलीस आयुक्तपदाची पदोन्नती नाकारली आहे. अनेक अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणूनच पोलीस ठाण्यात कार्यरत राहणे पसंत करतात. मात्र, यामुळे पदोन्नती प्रक्रिया अडथळलेली असून इतर पात्र अधिकाऱ्यांना संधी मिळण्यात अडचणी येतात. यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता कठोर भूमिकेचे संकेत दिले आहेत.

यासंदर्भातील पूर्वीच्या अध्यादेशातही स्पष्ट उल्लेख आहे की, पदोन्नती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात यावी. तसेच, ज्यांनी प्रथमच पदोन्नती नाकारली आहे, त्यांचा विचार तिसऱ्या वर्षी होणाऱ्या निवडसूचीत केला जाईल.

या पार्श्वभूमीवर आता संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध नेमकी कारवाई होते का, याकडे पोलीस दलासह सर्वच घटकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Spread the love