पुणे: आधी ढाब्यावरच्या मटण बिर्याणीचा फटका, आता कोर्टाचा झटका; गजा मारणेला मोठा धक्का

IMG_20250514_122811.jpg

पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याला न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. कोथरूडमध्ये आयटी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणी दाखल मकोका गुन्ह्यात त्याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी गजानन मारणे याला पोलिसांच्या संरक्षणात सांगली कारागृहात हलविण्यात येत असताना महामार्गावरील धाब्यावर मटण पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर त्याच्यावर झालेल्या कारवाईने पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

नेमकं काय घडलं?
19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कोथरूडमधील भेलकेनगर येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या देवेंद्र जोग या सॉफ्टवेअर इंजिनिअरला मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या टोळीतील सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणात आरोपी गजा मारणे याने जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी सध्या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे नमूद करत त्याचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच, गुन्हे शाखेला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढही मंजूर केली आहे.

या निर्णयामुळे गजा मारणेचा मुक्काम आणखी काही काळ तुरुंगातच राहणार असून, त्याच्या टोळीविरोधातील कायदेशीर कारवाईचा वेग अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

Spread the love

You may have missed