महापालिकेतील गैरव्यवहार? आयुक्त भोसले यांच्यावर चौकशीची मागणी; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल, अनावश्यक टेंडर, चुकीचे निर्णय’ राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

IMG_20250529_212308.jpg

पुणे, २९ मे २०२५: पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दीड वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या हजारो कोटी रुपयांच्या अनावश्यक निविदा आणि धोरणशून्य निर्णयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) ने गंभीर आक्षेप घेतला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारकडे डॉ. भोसले यांच्या नियुक्तीपासून २९ मे २०२५ पर्यंत त्यांनी घेतलेल्या सर्व आर्थिक व धोरणात्मक निर्णयांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
जगताप यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. भोसले यांनी लोकनियुक्त प्रतिनिधी नसताना आणि कोणतीही स्पष्ट आवश्यकता नसताना, पुणेकरांना भविष्यात त्रास देणारे अनेक चुकीचे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचे विपरीत परिणाम पुढील अनेक वर्षे पुणे शहरात दिसून येतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

विशेषतः, जगताप यांनी निदर्शनास आणले की, मावळत्या अधिकाऱ्याने धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत असा संकेत असतानाही, नवीन आयुक्त नवल किशोर राम यांची नियुक्ती होऊनही डॉ. भोसले यांनी हा संकेत पायदळी तुडवला आहे. त्यांनी स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या तातडीच्या बैठका घेऊन शेकडो कोटी रुपयांच्या निविदांना मान्यता दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेच्या दक्षता समितीने आक्षेप घेतलेल्या प्रकरणांनाही त्यांनी मान्यता दिली असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.

या सर्व नियमबाह्य गोष्टींना पायबंद घालण्यासाठी, जगताप यांनी डॉ. भोसले यांनी मागील महिनाभरात घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करण्याची आणि त्या सर्व निर्णयांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, जर चौकशी झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही प्रशांत जगताप यांनी दिला आहे. पुणे महानगरपालिकेतील या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात आणि पुणेकरांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Spread the love