पुण्यातील मंगळवार पेठेत सराईताचा गोळीबार; दोघांकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त

पुणे : मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ (शनिवार) पहाटे गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. रोहित माने (वय 32, रा. लोहियानगर) या सराईत गुन्हेगाराने गोळीबार केला असून, पोलिसांनी त्याला घटनास्थळीच अटक केली. या प्रकरणी त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास किरण केदारी,शाम गायकवाड,अश्पाक शेख, संतोष कांबळे, हे चौघेजण मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून ये जा करत होते. त्यांना हटकले. त्याचा राग आरोपींना आला त्यातून त्यांनी या चौघांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र सुदैवाने कोणाला गोळी लागली नाही. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघा आरोपींना अटक केली.
पुणे पोलिसांकडून दोघांना अटक
गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रोहित माने याला अटक केली. काही वेळातच त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही पकडण्यात आले. पोलिसांनी दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि काही काडतुसे हस्तगत केली आहेत.
यापूर्वीही रोहितवर गुन्हे दाखल
रोहित माने हा पूर्वीपासूनच पोलिसांच्या रडारवर असलेला गुन्हेगार असून, त्याच्यावर आर्म्स ॲक्ट, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. सध्या गुन्हे शाखा आणि फरासखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.