वाघोलीत १७ लाखांचा गुटखा जप्त; पण इतके दिवस पोलीस झोपले होते का?

0
InShot_20260624_010846501

पुणे : वाघोली परिसरात पोलिसांनी तब्बल १७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा, पानमसाला, जर्दा, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विदेशी सिगारेटचा साठा जप्त केल्याची कारवाई गाजत असली, तरी या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून गुटखा आणि काही तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात माल वाघोली परिसरात पोहोचलाच कसा? हा साठा नेमका कोणाच्या संरक्षणाखाली आणि कोणाच्या आशीर्वादाने विक्रीसाठी आणला जात होता, याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पोलिसांनी एका स्कॉर्पिओ वाहनातून हा माल जप्त केला. मात्र हा माल शहरात किंवा परिसरात प्रथमच आला होता का, की यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक खेपा यशस्वीरित्या पोहोचल्या होत्या, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. वाघोली, लोणी काळभोर आणि पूर्व हवेली परिसरात गुटखा विक्रीचे जाळे अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये असताना संबंधित यंत्रणांना याचा सुगावा कसा लागला नाही, असा सवाल केला जात आहे.

विशेष म्हणजे, पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडून मोठी कारवाई केल्याचा दावा केला असला, तरी या बेकायदेशीर व्यापारामागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, त्यांचा शोध घेण्यात प्रशासन कितपत यशस्वी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ वाहन चालक किंवा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवले जाणार की पुरवठादार, वितरक आणि विक्रेते यांच्यापर्यंत तपास पोहोचणार, याबाबतही नागरिक साशंक आहेत.

दरम्यान, वाघोली आणि आसपासच्या भागात अनेक ठिकाणी खुलेआम गुटखा आणि बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. त्यामुळे ही कारवाई केवळ दिखाऊ आहे की खरोखरच गुटखा माफियांवर लगाम घालण्यासाठी मोठी मोहीम राबवली जाणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकीकडे प्रशासन जनजागृतीच्या माध्यमातून तंबाखूमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न दाखवत असताना दुसरीकडे लाखो रुपयांचा प्रतिबंधित माल सहजपणे बाजारात पोहोचत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढवून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Spread the love

Leave a Reply