शाळेच्या दारात ‘दारू’चे धडे? वाघोलीत वाइनशॉपवर नागरिकांचा संताप; प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
महिला, विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात असल्याचा आरोप; तक्रार देऊनही कारवाईची प्रतीक्षा
वाघोली (प्रतिनिधी) :’शाळा वाचवा की दारू विक्री वाढवा?’ असा संतप्त सवाल आता वाघोलीतील नागरिक विचारू लागले आहेत. आव्हाळवाडी रस्त्यावरील प्राथमिक शाळेजवळ सुरू असलेल्या वाइनशॉपमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि परिसरातील महिलांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन मात्र नेहमीप्रमाणे “चौकशी करू” या जुन्याच भूमिकेत असल्याची टीका होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शाळेजवळच सुरू असलेल्या वाइनशॉपमुळे दिवसभर मद्यधुंद व्यक्तींचा वावर, गोंधळ आणि बेशिस्तपणा सुरू असतो. शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांसमोर हे चित्र उभे राहत असताना संबंधित यंत्रणांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
स्थानिक रहिवासी संदीप कटके यांनी दारूबंदी व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली असून, अल्पवयीन मुलांना मद्यविक्री, तसेच काही बेकायदेशीर हॉटेल व ढाब्यांना मद्यपुरवठा होत असल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. एवढे आरोप असूनही तत्काळ कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने, महिलांना होणारा त्रास आणि शाळेजवळचे असुरक्षित वातावरण यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे. नियम सर्वांसाठी समान असतील, तर या वाइनशॉपबाबत अपवाद का? असा सवालही परिसरातून उपस्थित होत आहे.
दरम्यान, “तक्रारीची चौकशी करण्यात येईल. नियमभंग आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल,” असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अतुल कानडे यांनी सांगितले. मात्र, नागरिकांच्या मते चौकशीच्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कारवाईचीच आता गरज असून, अन्यथा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.