पुण्यात पुन्हा हिट अँड रन प्रकरणः भरधाव ऑडी चालकाने दुचाकीस्वाराचा घेतला बळी, कोरेगाव पार्क परिसरातील घटना
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान कारने MH12 NE 4464 पहिल्यांदा एक्टिवावरील तिघांना धडक दिली. या घटनेमध्ये ते तिघे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर या कारने पुढे जाऊन एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली आहे. यामध्ये चालक रौफ अकबर शेख गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना नोबल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
कारचालक दारुच्या नशेत असल्याची प्रथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघात झाल्यावर चालक भरधाव वेगात कार घेऊन पळून गेला. या आलिशान कारच्या चालकाने २ दुचाकींना धडक दिली यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.
या अपघातांनंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. अपघात झालेल्या परिसरातील सीसीटिव्हीद्वारे कारचा नंबर मिळवण्यात आला, त्यानंतर त्या कारचालकाचा मोबाईल नंबर काढून त्यावरून पत्ता मिळवण्यात आला आहे. या अपघाच प्रकरणातील कारचालकाचे नाव आयुष प्रदीप तयाल (वय 34 वर्षे रा. हडपसर) याला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतलं आहे. तसेच कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई पोलिस करत आहेत.