सिंहगड रस्त्यावर अतिक्रमणांचा विळखा; फुटपाथपासून उद्यानाच्या प्रवेशद्वारापर्यंत कब्जा!
Oplus_16908288
गणेशमळा ते राजाराम पुलादरम्यान अनधिकृत अतिक्रमणांचा सुळसुळाट; ग्राहकांसह विक्रेत्यांची वाहने रस्त्यावरच पार्किंग, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष!
पुणे | गुरुवार, दि. १९नोव्हेंबर २०२६ :
सिंहगड रस्त्यावर गणेशमळा ते राजाराम पूल दरम्यान फुटपाथ आणि रस्त्याच्या कडेला अतिक्रमणांनी मोठ्या प्रमाणात पाय पसरले आहेत. फळे, भाजीपाला आणि विविध वस्तूंच्या विक्रेत्यांनी फुटपाथवर अतिक्रमण करून जागा व्यापली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही.
विशेष म्हणजे, ग्राहक खरेदीसाठी थेट रस्त्यावर वाहने उभी करतात. त्याचबरोबर विक्रेत्यांची वाहनेही दिवसभर रस्त्याच्या कडेला पार्क केली जात असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत आहे. परिणामी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अतिक्रमणाचा कळस म्हणजे पु. ल. देशपांडे उद्यानाचे प्रवेशद्वारही अतिक्रमणाच्या विळख्यात! प्रवेशद्वारावर भेळ, पाणीपुरीसह विविध खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने नागरिकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग अडवला जात आहे. लहान मुलांना घेऊन उद्यानात येणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दिवसभर उघडपणे सुरू असलेल्या या अतिक्रमणांकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फुटपाथ पादचाऱ्यांसाठी की अतिक्रमणांसाठी? उद्यानाचे प्रवेशद्वार मोकळे करण्याची जबाबदारी कोणाची? महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून सिंहगड रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत आणि पादचाऱ्यांसाठी फुटपाथ मोकळे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४