२० हजारांची लाच घेताना ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात; लोणावळ्यात ACBचा सापळा
गुन्ह्याचे कलम कमी करणे, जामिनासाठी मदत आणि लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी लाचेची मागणी
लोणावळा : गुन्ह्याचे कलम कमी करून जामीन मिळवून देण्यासह पुढील तपासात सहकार्य करण्यासाठी आणि लवकर आरोपपत्र दाखल करण्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. नाथा रामकिशन केकाण (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, ते लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. १६ नोव्हेंबर रोजी रात्री मॅप्रो गार्डनजवळील फूड कोर्ट येथे ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील ३३ वर्षीय तक्रारदाराच्या भावाविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास केकाण यांच्याकडे होता. तक्रारदाराच्या आरोपानुसार, भावावरील गुन्ह्याचे कलम कमी करणे आणि जामीन मिळवून देण्यासाठी केकाण यांनी यापूर्वी वेळोवेळी एक लाख ३० हजार रुपये स्वीकारले होते.
दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी भावावरील चॅप्टर केसच्या कारवाईत मदत करणे, दाखल गुन्ह्याच्या पुढील तपासात सहकार्य करणे आणि लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी त्यांनी आणखी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
तक्रारीच्या अनुषंगाने १६ नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी केकाण यांनी यापूर्वी लाचेची रक्कम स्वीकारल्याचे मान्य केल्याचे ACBच्या पडताळणीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, ३० हजार रुपयांऐवजी २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
त्यानंतर ACBने सापळा रचला. मॅप्रो गार्डनशेजारील फूड कोर्ट येथे पंचांसमक्ष तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना केकाण यांना रात्री ७.१५ वाजता रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ACBकडून सांगण्यात आले.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी केले. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली महिला पोलीस हवालदार वनिता गोरे, पोलीस शिपाई रवी दिवेकर आणि चालक पोलीस हवालदार दगडू सोनवणे यांनी सापळा कारवाईत सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.