रुग्णालयातील स्ट्रेचरचा राडारोडा वाहतुकीसाठी वापर; ठेकेदाराला २५ हजारांचा दंड

0
n7340011321794888123900f1623bdf3cd841d0098a4cc5494c76f7f2ad5e71b968e617ba03904c827d56fa

पुणे : रुग्णांना तातडीने उपचारासाठी ने-आण करण्यासाठी असलेल्या स्ट्रेचरचा वापर बांधकामाचा राडारोडा वाहून नेण्यासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार कमला नेहरू रुग्णालयात उघडकीस आला होता. या प्रकाराची दखल घेत पुणे महापालिकेच्या भवन विभागाने संबंधित ठेकेदारावर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंडाची रक्कम तत्काळ वसूल केली आहे.

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. तेजदर्शन इन्फ्रा प्रा. लि. या ठेकेदार कंपनीकडून सुमारे १२ कोटी रुपये खर्चाचे हे काम करण्यात येत आहे. मात्र, बांधकामातून निर्माण होणारा राडारोडा रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या स्ट्रेचरवरून वाहून नेला जात असल्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता.

रुग्णांना वेळेवर स्ट्रेचर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी असताना बांधकामाचा राडारोडा वाहून नेण्यासाठी त्याच स्ट्रेचरचा वापर होत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच या प्रकाराकडे रुग्णालयातील डॉक्टर, सुरक्षारक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही, असा सवालही उपस्थित झाला होता.

अखेर या प्रकाराची गंभीर दखल घेत भवन विभागाने संबंधित ठेकेदारावर आर्थिक दंडाची कारवाई केली. ठेकेदाराला २५ हजार रुपयांचा दंड आकारून त्याची रक्कम वसूल करण्यात आली आहे. भविष्यात रुग्णालयातील साहित्याचा अशा प्रकारे गैरवापर झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

याबाबत भवन विभागाचे प्रमुख बिपीन शिंदे यांनी दंडात्मक कारवाईची माहिती दिली.

Spread the love

Leave a Reply

You may have missed