वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मंगल कार्यालये, लॉजच्या बिगर निवासी करात अनियमितता; तक्रारीनंतर नऊ महिने उलटूनही प्रशासन सुस्त
पुणे महानगरपालिकेच्या वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या मंगल कार्यालये, सभागृहे आणि लॉजच्या बिगर निवासी कर (Non-Residential Tax) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता व नियमभंग होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मात्र, याप्रकरणी तक्रार दाखल करून तब्बल नऊ महिने उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून तक्रारदाराला अद्याप लेखी स्वरूपात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
रियाज मोहिदीन शेख (रा. वारजे, पुणे) यांनी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली होती.
प्रशासकीय कामकाजावर गंभीर आरोप:
तक्रार करून नऊ महिने उलटले तरी या प्रकरणावर अद्याप कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. एस.आय.आर. (S.I.R.) सर्वेक्षणाच्या नावाखाली संबंधित अधिकारी व कर्मचारी (D.I. आणि S.I.) दिवसभर कार्यालय सोडून बाहेर असतात, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीतील प्रमुख मुद्दे:
कराशिवाय व्यवसाय सुरू: सन २०२५ ते २०२६ या कालावधीत काही आस्थापनांवर आवश्यक वैध बिगर निवासी कर आकारलेला नसतानाही त्यांचे व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
नियमावलीचे उल्लंघन: बिगर निवासी कर निश्चित करताना आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर निकष आणि परवाना मंजुरी व नूतनीकरणाच्या अटींची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह: नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
प्रमुख मागण्या:
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व मंगल कार्यालये, सभागृहे व लॉजची सखोल चौकशी करावी. कायद्याचे उल्लंघन करणारी आस्थापने तात्काळ बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. तसेच, या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि केलेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात कळवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.