पुण्यात मध्यरात्री पोलिसांच्या गस्ती पथकाशी हुज्जत! नशेत धिंगाणा घालणाऱ्या वाघोलीतील दोघांची पोलिसांना धक्काबुक्की; गणवेशाचे बटणही तुटले
पुणे : शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मध्यरात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनाच नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणांच्या मुजोरीचा सामना करावा लागल्याची घटना खराडी परिसरात घडली. पोलिसांनी गोंधळ घालण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने दोघांनी पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायाला धक्काबुक्की केली. या झटापटीत पोलिसांच्या गणवेशाचे बटणही तुटले. बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास टेक्सास टॉवर सोसायटीसमोर हा प्रकार घडला.
या प्रकरणी अजय जयकुमार सावंत (वय ३५) आणि किसन सूर्यभान झेंडे (वय ३२, दोघे रा. बायफ रस्ता, वाघोली) यांच्याविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी पोलिसांचे पथक टेक्सास टॉवर सोसायटीसमोर मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी अजय सावंत आणि किसन झेंडे हे दोघे नशेत गोंधळ घालत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना गोंधळ न घालण्याची समज दिली. मात्र, समज देणेच दोघांना चांगलेच खटकले.
दोघांनी पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे आणि पोलीस शिपाई अशोक केदार यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली. या झटापटीत पोलीस कर्मचाऱ्याच्या गणवेशाचे बटण तुटले. पोलिसांशीच धक्काबुक्की करण्यापर्यंत दोघांची मजल गेल्याने परिसरात खळबळ उडाली.
या प्रकरणी पोलीस शिपाई अशोक केदार यांनी फिर्याद दिली आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. सातपुते पुढील तपास करीत आहेत.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच गस्तीवर असताना धक्काबुक्की होत असेल, तर अशा मुजोर प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.