प्रेयसीचे दुसऱ्याशी लग्न, स्वतःचेही लग्न जमेना; निराशेतून तरुणाची आत्महत्या! मित्रांना पाठवला शेवटचा मेसेज; हॉटेलच्या खोलीत कपाळावर गोळी झाडून जीवन संपवले
पुणे : प्रेमात अपयश आणि स्वतःचे लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून २६ वर्षीय तरुणाने खराडीतील एका हॉटेलमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने मित्रांना ‘ही आपली शेवटची भेट, यानंतर पुढच्या जन्मी भेटू’ असा भावनिक संदेश पाठवला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अक्षय कालिदास कांबळे (वय २६, रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा) असे मृत तरुणाचे नाव आहे. खराडीतील तुळजाभवानी नगर येथील हॉटेल गौरव रेसिडेन्सीमध्ये २९ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा लक्ष्मण चव्हाण यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा कोरेगाव भीमा येथील स्टेट बँकेत कंत्राटी पद्धतीने नोकरी करत होता. तो २७ ऑक्टोबरपासून हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत वास्तव्यास होता. २९ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत खोलीचा दरवाजा न उघडल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी अक्षय खोलीत खाली पडलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या हातात पिस्तूल होते. याबाबत रिसेप्शनिस्ट जितेंद्र पाडी याने खराडी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अक्षयच्या वडिलांनी आणि भाऊ विशाल कांबळे यांनी त्याची ओळख पटवली. प्राथमिक तपासात त्याने कपाळाच्या मध्यभागी गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले.
दरम्यान, अक्षयचे लग्न जमत नसल्याने तो निराश होता. त्यातच त्याचे प्रेम असलेल्या तरुणीने दुसऱ्या तरुणाशी विवाह केल्याने त्याला मानसिक धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. याच नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आत्महत्येपूर्वी मित्रांना पाठवलेल्या शेवटच्या संदेशामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले आहे.
मात्र, अक्षयकडे विनापरवाना पिस्तूल आले कुठून? त्याने आत्महत्या करण्यामागील नेमके कारण काय? यासह अन्य बाबींचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे करीत आहेत.