पुणे: पक्षनिष्ठा सकाळी, तिकीट दुपारी आणि झेंडा संध्याकाळी! दलबदलू उमेदवारांचा ‘राजकीय जिमखाना’; सोशल मीडियावर खिल्ली
पुणे, दि. ३१ (प्रतिनिधी) –
कोंढव्यात महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत निष्ठा ही वेळेनुसार बदलणारी वस्तू आहे, याचा प्रत्यय नागरिकांना दररोज येत आहे. उमेदवारीसाठी राजकीय स्वार्थापोटी एका दिवसात दोन-तीन पक्ष कार्यालयांत हजेरी लावणाऱ्या तथाकथित निष्ठावंतांची चांगलीच डिजिटल धुलाई सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
२३ ते ३० डिसेंबर या कालावधीत अर्ज भरण्याच्या धावपळीत अनेक इच्छुक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन, घोषणा आणि पक्षनिष्ठेचे दाखले देण्याचा आटापिटा केला. “आम्ही जन्मजात अमुक पक्षाचे” असे छातीठोक दावे करणारे चेहरे सकाळी ज्या कार्यालयात दिसले, तेच चेहरे दुपारी मात्र दुसऱ्याच पक्षाच्या दारात ‘चर्चा सुरू आहे’ अशा अविर्भावात दिसू लागले.
तिकीट हातातून निसटताच सकाळी तत्त्वज्ञान सांगणारे उमेदवार सायंकाळी नव्या पक्षाचा झेंडा खांद्यावर टाकून हजर झाल्याने राजकारणाचा तमाशा रंगला आहे. तत्त्वे बदलली नाहीत, फक्त झेंडा बदलला, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया नागरिकांत उमटत आहे.
या दलबदलू प्रवृत्तीवर सोशल मीडियाने मात्र कोणतीही दया दाखवलेली नाही. फेसबुक, व्हॉट्सअॅपवर “सकाळी पक्ष A, दुपारी पक्ष B, संध्याकाळी स्वागतम् पक्ष C” अशा आशयाच्या पोस्ट, मीम्स आणि विनोदी संदेश जोरदारपणे व्हायरल होत आहेत. वास्तवाची धार असलेल्या या विनोदांनी राजकीय स्वार्थाची चांगलीच चिरफाड केली आहे.
निष्ठा, विचारधारा आणि तत्त्वे यांचा गाजावाजा करणाऱ्या राजकारणात उमेदवारीसाठी सर्व काही तात्पुरते ठरते, हेच या घडामोडींनी पुन्हा अधोरेखित केले आहे. प्रश्न एवढाच उरतो की,
➡️ निष्ठा बदलणाऱ्यांना मतदार किती गंभीरपणे घेणार?
➡️ झेंडा बदलणे सोपे असले तरी विश्वास मिळवणे तितकेच सोपे राहील का?
कोंढव्यात सध्या तरी राजकारणापेक्षा त्यावर होणारी सोशल मीडिया टोलेबाजी अधिक चर्चेत असल्याचे चित्र आहे.