सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रयेजा सिटी रस्त्यावरील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह; मग इतर भागांची स्थिती काय?

0

पुणे | दि. २ जुलै २०२६ : पावसाळ्यापूर्वी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नालेसफाईची कामे…

Spread the love
IMG_20260703_185208

पुणे | दि. २ जुलै २०२६ : पावसाळ्यापूर्वी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रयेजा सिटी रस्त्यावरील काही नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वेगळेच वास्तव समोर आले आहे.



पाहणीदरम्यान अनेक नाल्यांमध्ये गाळ, माती, दगड, प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला दिसून आला.विशेष म्हणजे अद्याप मुसळधार पाऊस झालेला नसतानाही ही परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील केवळ प्रयेजा सिटी रस्त्यावरील नाल्यांची पाहणी करतानाच अशी अवस्था आढळून आली, तर या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील इतर भागांतील नाल्यांची परिस्थिती नेमकी कशी असेल? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.



प्रशासनाकडून नालेसफाई पूर्ण झाल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत आहे? संबंधित अधिकारी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करतात का? नालेसफाई पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कोणत्या निकषांवर दिले जाते? ठेकेदारांनी केलेल्या कामाचे मोजमाप आणि गुणवत्ता तपासली जाते का? अपूर्ण अथवा निकृष्ट दर्जाच्या कामांसाठी जबाबदारी निश्चित केली जाते का? असे अनेक प्रश्न या पाहणीनंतर उपस्थित होत आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने केवळ प्रयेजा सिटी रस्त्यावरील नव्हे, तर संपूर्ण हद्दीतील सर्व छोट्या-मोठ्या नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी तातडीने प्रभावी साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा मुसळधार पावसात पाणी तुंबणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

आता सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय या वास्तवाची गंभीर दखल घेऊन संपूर्ण हद्दीतील नालेसफाईची फेरतपासणी करणार का? की कागदोपत्री दावेच सुरू राहणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply