येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग : ८ हजार कोटींचा प्रस्तावित प्रकल्प

n651934064173950817152697754db2302e8f89f988f00f67c28b171087d67e0613439b528c4ad8dd7a1c6a.jpg

पुणे : शहरातील दळणवळणाला वेग देण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या खर्चाने उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी प्रति किलोमीटर ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

या भुयारी मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तो राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या भुयारी मार्गाला ‘ट्वीन टनेल’ पद्धतीचा अवकाश देण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

उत्तर-दक्षिण दळणवळणासाठी महत्त्वाचा मार्ग
पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, “पुणे शहरात पूर्व ते पश्चिम जोडणारे रस्ते अनेक आहेत; मात्र, उत्तर-दक्षिण जोडणाऱ्या रस्त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे पीएमआरडीएने हा मार्ग प्रस्तावित केला आहे. या कामाची पाहणी करून त्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल आणि त्यानंतर अहवाल सादर केला जाईल.”

पूर्वीच्या योजनांचा अनुभव आणि नागरिकांमध्ये शंका
पुणे-मुंबई हायपरलूप आणि पुण्यातील नदी जलवाहतुकीचे प्रस्तावित प्रकल्प अंमलात येऊ शकले नाहीत. त्यामुळे येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाचा प्रस्ताव प्रत्यक्षात येणार की नाही, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार का, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Spread the love