पुण्यात अवकाळी पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याची शक्यता

855319-imd-maharashtra-weather.jpeg

पुणे : मे महिन्याच्या तीव्र उन्हापासून दिलासा देणारा अवकाळी पाऊस शहरात पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने पुढील चार ते पाच दिवस पुणे शहरासह जिल्ह्यात मेघगर्जना, वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत गारपीटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शनिवारी (दि. १०) शहर परिसरात ढगाळ वातावरण होते, तर जिल्ह्याच्या काही भागांत हलकासा पाऊस पडला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पुढील काही दिवसांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भात पाच दिवस, तर इतर भागांमध्ये तीन दिवस वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह पाऊस होईल.

अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर व घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, त्यामुळे तापमानात घट झाली आहे. पुण्यातील लोहगावमध्ये सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल शिरूर (३६.५), मगरपट्टा (३६.२), बारामती (३५.९), कोरेगाव पार्क (३५.६), एनडीए (३५.४), पाषाण (३५), आणि दौंड (३४.६) अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असला तरी शेती, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर याचा काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love

You may have missed