पुण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीदरम्यान वाहतूक मार्गांमध्ये बदल; पोलिसांचा मार्ग बदलांचा सल्ला

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी, 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त शहरात दोन मोठ्या मिरवणुका आणि एक पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते सकाळपासून वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. काही रस्ते पूर्णपणे तर काही अंशतः बंद राहतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मुख्य मिरवणूक दुपारी 4 वाजता भवानी पेठेतील भवानीमाता मंदिरापासून सुरू होईल. रामोशी गेट चौक, नेहरू रोड, ए. डी. कॅम्प चौक, संत कबीर चौक, नाना चावडी चौक, सतरंजीवाला चौक आणि सोन्या मारुती चौक मार्गे मिरवणूक फडके हौद चौक आणि जिजामाता चौकातून लालमहाल येथे समाप्त होईल.
दुसरी मिरवणूक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सकाळी 9 वाजता सुरू होईल. या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे प्रतीक असलेले 96 स्वराज्यरथ सहभागी होणार आहेत.
शिवजयंतीनिमित्त केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा इंजिनीअरिंग कॉलेज मैदान ते फर्ग्युसन कॉलेज मैदान या मार्गावर सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत काढण्यात येईल. त्यामुळे जंगली महाराज रोड आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोडसह काही महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
बंद रस्ते व पर्यायी मार्ग:
शिवाजी रोड: स्वारगेटकडे जाणारी वाहतूक बर्वे चौकातून जंगली महाराज रोड, खंडुजीबाबा चौक आणि टिळक रोडने वळवण्यात येईल.
कुंभार वेस: गाडगीळ पुतळ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक कुंभार वेस चौकातून उजवीकडे वळवून डेंगळे पूल आणि सावरकर चौकातून जाईल.
केळकर रोड: अप्पा बळवंत चौक ते जोगेश्वरी मंदिर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
लक्ष्मी रोड: संत कबीर चौकातून सोन्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.
बाजीराव रोड: पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली असून टिळक रोड, अलका टॉकीज मार्गे गोखले रोड वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पार्किंग व्यवस्था:
पदयात्रेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी अभियांत्रिकी कॉलेज आणि नदीपात्र भागात पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेमुळे शिवाजी रोड, बाजीराव रोड, जंगली महाराज रोड आणि गोखले रोड वाहतुकीसाठी बंद राहतील. त्यामुळे स्वारगेट आणि शिवाजीनगर दरम्यानच्या प्रवासासाठी दांडेकर पूल, म्हात्रे पूल, नळ स्टॉप आणि एरंडवणे मार्गे सेनापती बापट रोडचा वापर करावा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.