अनधिकृत रिसॉर्टवरील महसूल अधिकाऱ्यांचा डान्स व्हायरल; पण कारवाई होईल का? महसूल मंत्र्यांचे याकडे लक्ष आहे का? – व्हिडिओ

पुणे: पुण्यातील खेड तालुक्यातील एका अनधिकृत रिसॉर्टवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत महसूल विभागावर तीव्र निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “जनता कर भरते आणि महसूल अधिकारी अनधिकृत रिसॉर्टवर मौज करतात!” असा सवाल उपस्थित केला आहे.
ही वादग्रस्त पार्टी खेड तालुक्यातील एका अनधिकृत रिसॉर्टमध्ये पार पडली असून, या पार्टीत उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी डान्स करत सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामांवर महसूल विभाग कारवाई करतो, तर दुसरीकडे महसूल अधिकारीच अनधिकृत रिसॉर्टमध्ये आनंद लुटत असल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
पहा व्हिडिओ
महसूल मंत्र्यांचे याकडे लक्ष आहे का?
या प्रकरणावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा अशा पद्धतीने अनधिकृत रिसॉर्टवरील सहभाग म्हणजे दुहेरी भूमिका असल्याची टीका होत आहे.
“ही फक्त स्नेहभोजन पार्टी होती” – उपविभागीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हिरवळीवर हा कार्यक्रम पार पडला आणि त्यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यानंतर स्नेहभोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तथापि, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राज्यभर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आता महसूल मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर काय कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.