पुणे : सरपंच देशमुख आणि सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाज एकवटला; मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी (५ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मध्य पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत.
लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग
लाल महाल येथून रविवारी सकाळी ९ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, १५ ऑगस्ट चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाईल.
वाहतूक बदलांची घोषणा
मोर्चामुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता आणि गणेश रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात येणार असून या मार्गांवर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
स्वारगेटकडे जाणारे वाहन : छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याऐवजी स. गाे. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक मार्गे जावे.
महापालिकेकडे जाणारे वाहन : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता व काँग्रेस भवनमार्गे जावे.
जिजामाता चौकाकडे जाणारे वाहन : दारूवाला पूल परिसरातील वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
मालधक्का चौकाकडे जाणारे वाहन : नेहरू रस्त्याऐवजी पाॅवर हाऊस मार्गे जावे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे वाहन : मालधक्का चौकातून बोल्हाई चौक, साधू वासवानी चौक मार्गे जावे.
वाहनचालकांना पोलिसांचे आवाहन
लष्कर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि लाल देऊळ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांनी बॅनर्जी चौक मार्गे इच्छित स्थळी जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे पोलिसांनी सांगितले आहे.