पुणे: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष प्रदर्शन; फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिक जागरूक होण्याची गरज

n6447563151735057667076170cdef10940f6a1bf1de1a6cd0552bf927156204288c6c39d3e67e3d22e06a2.jpg

पुणे: राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती देण्यासाठी व त्याबद्दल जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने पुण्यात विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी डॉ. सुहास मापारी यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष विलास लेले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ग्राहक सजगतेचे महत्व
श्री. विलास लेले यांनी आर्थिक शोषण टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहणे आणि संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले. “फसवणुकीच्या पद्धती बदलत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.

सायबर क्राईम सेलचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले यांनी सायबर गुन्ह्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. “ऑनलाईन आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी सतर्कता आणि योग्य काळजी घेणे गरजेचे आहे,” असे त्यांनी मार्गदर्शन केले.

विविध विभागांचा सहभाग
प्रदर्शनात ग्राहकांसाठी विविध विभागांनी स्टॉल लावले होते. यात विधी सेवा प्राधिकरण, भारतीय जीवन विमा, सायबर क्राईम सेल, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी विभागांचा समावेश होता.

ग्राहकांना आपल्या हक्कांची माहिती व जाणीव होण्यासाठी या प्रदर्शनाने मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Spread the love