पुणे: सिझनचा सुळसुळाट! खासगी बसचालकांकडून प्रवाशांची लूट; आरटीओचा कारवाईवर आखडता हात

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी पिंपरी-चिंचवड परिसरातून मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रेल्वे आणि एसटीची वाहतूक फुल्ल झाल्याने अनेक प्रवासी खासगी बसचा पर्याय निवरत आहेत. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेत खासगी प्रवासी बसचालकांनी सिझनच्या नावाखाली तिकीट दर दुप्पट-तिप्पट वाढवले आहेत. या मनमानी दरवाढीमुळे प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
आरटीओकडून दुर्लक्ष?
राज्य सरकारने २७ एप्रिल २०१८ रोजी खासगी प्रवासी बससाठी एसटीच्या भाडेदराच्या दीडपट भाडे आकारण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सध्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या या मर्यादेच्या कित्येक पट दर आकारत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांकडून यावर ठोस कारवाई होत नसल्याने प्रवाशांची सरकारी लूट सुरूच आहे.
दरनियमनाची मागणी
मनमानी दरवाढ रोखण्यासाठी विविध प्रवासी संघटनांनी आरटीओकडे निवेदन दिले आहे. खासगी बसच्या भाडेदरावर आरटीओने नियंत्रण ठेवावे आणि दर निश्चित करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, नियम तोडणाऱ्या बसचालकांवर कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.
प्रवाशांचे संतप्त प्रतिक्रिया
“रेल्वे आणि एसटीमध्ये तिकीट मिळत नाही, म्हणून ट्रॅव्हल्स हाच पर्याय राहतो. पण त्यांचे तिकीट दरच ऐकून अंगावर काटा येतो. काही ठिकाणी दुप्पट-तिप्पट दर आकारले जात आहेत,” असे म्हणत गणेश गायकवाड या प्रवाशाने आपली नाराजी व्यक्त केली. तर, “ट्रॅव्हल्सची तपासणी पथकामार्फत व्हावी. बुकिंग काउंटरवर देखील तपासणी करावी,” अशी मागणी महेश राणे या प्रवाशाने केली आहे.
शिस्त लावणार कोण?
दरवर्षी सणासुदीच्या आणि सुट्टीच्या काळात हा प्रकार घडतो. आरटीओकडून कारवाईची आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात फारसे काही घडताना दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांची लूट थांबणार कधी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
—