पुणेकरांनो सावध ! पावसाळ्यासाठी प्रशासन सज्ज; मान्सूनपूर्व तयारीसाठी मनपा आणि पोलिसांचा संयुक्त आढावा; होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य

पुणे – शहरात येणाऱ्या मान्सूनपूर्व संभाव्य धोके लक्षात घेता पुणे मनपा आणि पुणे पोलिस प्रशासनाने संयुक्त आढावा बैठक घेतली. शहरात मागील वर्षी वादळ, मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडल्या होत्या. यंदा अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत.
मोठ्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य
पावसाळ्यात वाऱ्यामुळे किंवा वादळी पावसामुळे होर्डिंग कोसळून जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे यंदा मनपा आणि पोलिस प्रशासनाने होर्डिंग धारकांसाठी कठोर पावले उचलली आहेत. शहरातील सर्व मोठ्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत मनपा अधिकारी आणि वाहतूक पोलिसांची होर्डिंग धारकांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४९ अंतर्गत नोटीस देऊन ऑडिट पूर्ण करण्याचे आदेश दिले जातील, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यावर भर
शहरातील सुमारे पाच हजार खड्ड्यांचा अहवाल मार्चमध्ये प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार खड्डे बुजवण्यात आले. मात्र, पावसाळ्यापूर्वी पुन्हा एकदा आढावा घेऊन आवश्यक तेथे रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.
धोकादायक इमारती व नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई
शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींचाही आढावा घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय पावसाळ्यात नदीपात्रात अतिरिक्त पाणीसाठा सोडल्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अतिक्रमणांविरोधात कारवाई केली जाणार आहे.
डेक्कन परिसरातील दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी
मागील वर्षी डेक्कन भागात नदीपात्रात वीजप्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांनी संभाव्य धोके दूर करण्याचे आदेश मिळाले आहेत.
पाणी साचणाऱ्या १०५ ठिकाणांची नोंद
शहरातील १०५ ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचते याची नोंद मनपाकडे असून, त्या ठिकाणी टुलू पंप बसवण्यात येणार आहेत. काही ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था योग्य प्रकारे काम करत नसल्यामुळे पाणी साचते. त्यामुळे ड्रेनेज साफसफाईलाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सखोल नियोजन
पाणी साठवणूक, खड्डे आणि झाडे कोसळण्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन यावर्षी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी जिथे पाणी साचले आणि वाहतूक कोंडी झाली, त्या जागांचे मॅपिंग करून सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत.
—
या संयुक्त बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे पुणेकरांचा पावसाळा अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.