पुणे: विश्रांतवाडीतील अवैध धंद्यांचा सुळसुळाट: नागरिकांची पोलीस प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी

pudhariimportwp-contentuploads202206Avaidh-Dhande.jpg

पुणे: विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस अवैध धंद्यांचा भडका उडत असून, नागरिकांकडून या धंद्यांना तात्काळ आळा घालण्याची मागणी जोर धरत आहे. मटका, जुगार, गांजा, गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, पत्त्याचे क्लब, बेकायदेशीर चकणा सेंटर, मसाज पार्लरच्या आड चालणारा वेश्याव्यवसाय, अशा विविध प्रकारच्या गैरप्रकारांनी परिसराला विळखा घातला आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. मात्र, विश्रांतवाडी हद्दीत या आदेशांना केराची टोपली दाखवत अवैध धंदे धडाक्यात सुरू असल्याची चर्चा सर्वसामान्यात आहे.

आदेशांनाही केराची टोपली?
विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच हे धंदे चालत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत असून, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गुन्हेगारीचा डोळा तरुण पिढीवर
अवैध धंद्यांमुळे अल्पवयीन मुले आणि युवक गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना दिसत आहेत. ऑनलाइन जुगार, मटका, दारू, आणि गुटख्याच्या व्यसनामुळे त्यांचे भवितव्य उध्वस्त होत आहे. अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त होत आहेत, तर काहीजण आर्थिक संकटामुळे आत्महत्या करत आहेत.

राजकीय आश्रयाचा आरोप
अवैध व्यवसायांना राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. गुन्हेगार दिवसाढवळ्या परिसरात वावरत असून, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांची मागणी
विश्रांतवाडीतील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी आणि अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ठोस कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे. काळा पैसा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याने या तक्रारींची गंभीर दखल घेत तात्काळ आणि कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा हा परिसर गुन्हेगारीचा अड्डा बनण्याचा धोका आहे.

Spread the love