पुणे: खोट्या मृत्यू दाखल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ; धनकवडी कार्यालयात बनावट मृत्यू नोंदीचा पर्दाफाश; दोघांना अटक

IMG_20250215_100814.jpg

पुणे: पुणे महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखल्याच्या रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील कोंढवा क्षेत्रीय कार्यालयात काम करणारे डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल रमेश निगडे आणि शुभम संजय पासलकर या दोघांना दिघी सागरी पोलीस ठाण्याने अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

रामकुमार ब्रह्मदत्त अग्रवाल (रा. कॅम्प, पुणे) यांच्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले येथील ४० गुंठे जमिनीच्या फसवणूक प्रकरणात मार्च २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पुणे महापालिकेत बनावट मृत्यू दाखले बनवण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले.

या गुन्ह्यात आरोपींनी बनावट व्यक्ती रामकुमार अग्रवाल यांच्या नावाने खोटी कागदपत्रे आणि ओळखपत्र तयार करून ती श्रीवर्धनच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केली. यावरून जमिनीचे बनावट खरेदीखत तयार करून सातबारा उताऱ्यावर नोंदणी करण्यात आली होती.

तपासादरम्यान रामकुमार अग्रवाल यांचा मृत्यू झाल्याचा दाखला पुणे महापालिकेच्या धनकवडी कार्यालयातून काढल्याचे निष्पन्न झाले. मृत्यूची तारीख २५ मे २०२१ असल्याचे दाखवले गेले, मात्र कार्यालयात मृत्यूची नोंद १२ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आल्याचे आढळून आले. या विरोधाभासामुळे पोलिसांना संशय आला.

महापालिकेच्या धनकवडी कार्यालयाने मृत्यू दाखल्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तपासात मृत्यूची नोंद करणारे तत्कालीन उपनिबंधक डॉ. अमित शहा, अधिकारी पूनम घरपाळे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल निगडे व शुभम पासलकर यांचा आर्थिक लाभासाठी या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

दिघी सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अर्षद शेख यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तपासासाठी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणात विद्या ऑनलाईन सर्विसेस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

– डॉ. निना बोराडे, प्रमुख आरोग्य विभाग, पुणे महापालिका

Spread the love