पिंपरी: जनसंवाद सभेत पत्रकारांना मनाई; सुधारणा की तक्रारी लपविण्याचा डाव?

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीला तीन वर्षे पूर्ण झाली असून, नागरिकांच्या तक्रारींसाठी आयोजित जनसंवाद सभांबाबत नाराजी वाढत आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या निराकरणाऐवजी या सभा केवळ औपचारिकतेपुरत्या राहिल्या असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. दै. प्रभातने मंगळवारी, ११ फेब्रुवारीला ‘महापालिका जनसंवाद सभा ठरतेय औपचारिकता’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या विषयाला वाचा फोडली होती.
याची दखल घेत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित राहावेत, तक्रारींचे व्यवस्थित निराकरण व्हावे यासाठी नवे निर्देश दिले आहेत. सभेच्या आयोजनात अनेक बदल सुचविण्यात आले आहेत.
सभेच्या नियोजनात महत्त्वाचे बदल
• नागरिकांची तक्रार अर्जावर लिहून घेतली जाईल.
• वैयक्तिकरित्या नागरिकांना न बोलावता उपस्थित सर्वांना चर्चेत सहभागी करून घेण्यात येईल.
• प्रत्येक तक्रारदाराला मांडणीसाठी विशिष्ट वेळ दिला जाईल.
• एक तक्रार पूर्ण ऐकल्याशिवाय दुसरी तक्रार घेऊ नये.
• तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्याची अट घालण्यात आली आहे.
• सभेला महिला आणि पुरुष सुरक्षा रक्षक उपस्थित असतील.
• तक्रारींचा अहवाल तयार करून त्यात प्रशासनाची उत्तरे व योजनाही नमूद केल्या जातील.
सभेनंतर नागरिकांचा अभिप्राय घेण्याचे आदेश.
पत्रकारांना प्रवेशबंदी; तक्रारी लपविण्याचा आरोप
महापालिका आयुक्तांनी या सभांना पत्रकारांना उपस्थित राहण्यास मनाई केली आहे. या सभेबाबत पत्रकारांना मुख्य समन्वय अधिकारीच माहिती देतील, असे निर्देश दिले आहेत. यामुळे महापालिकेने तक्रारी आणि अधिकाऱ्यांची उत्तरे लपविण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागरिकांचा असंतोष वाढतच
महापालिकेच्या सभांमध्ये नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींचे निराकरण होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. यामुळे या नव्या सूचनांमुळे समस्या सुटणार का, की केवळ औपचारिकताच चालू राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.