पुणे: भ्रष्टाचाराने पुन्हा डोके वर काढले; पुण्यातील तलाठी लाच घेताना सहकाऱ्यासह रंगेहाथ पकडले

पुणे – वडिलांच्या मृत्युपत्रानुसार जमीन मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी तलाठ्याने लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. बाणेर सज्जा कार्यालयातील तलाठी उमेश विठ्ठल देवघडे (३९) आणि त्यांचे साथीदार काळुराम ज्ञानदेव मारणे (३९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
मृत्युपत्राच्या अर्जाची मागणी; २० हजारांची लाचेची मागणी
तक्रारदाराच्या वडिलांच्या मृत्युपत्रानुसार वारस नोंदणीसाठी अर्ज सादर केला होता. या अर्जाच्या चौकशीदरम्यान तलाठी देवघडे यांनी सुरुवातीला २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १० हजार रुपये घेतल्याचे समोर आले. तक्रारदाराने याची माहिती एसीबीकडे दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.
सहकारी मारणेद्वारे लाच स्वीकारली; कारमध्ये ३ लाखांचा सापळा
तलाठी देवघडे यांच्या सांगण्यावरून काळुराम मारणे यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली. लाच स्वीकारतानाच त्यांना पकडण्यात आले. तपासादरम्यान देवघडे यांच्या कारमधून ३ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू
या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिस अधीक्षक नीता मिसाळ प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकारामुळे बाणेर परिसरात खळबळ उडाली आहे.