करदात्यांसाठी मोठी दिलासा: 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स सवलतीची शक्यता

Income-Tax-1.jpg

नवी दिल्ली : देशभरातील करदात्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वार्षिक 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना टॅक्समध्ये मोठी सवलत मिळण्याची शक्यता आहे. सरकार लवकरच यासंदर्भात निर्णय घेऊ शकते. केंद्र सरकारकडून मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेत मंदीमुळे घटलेल्या मागणीत सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मध्यमवर्गासाठी ही सवलत महत्त्वाची ठरेल, विशेषतः महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या शहरी मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळेल, असे जाणकारांचे मत आहे. वाढत्या खाद्यपदार्थांच्या किंमतींमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना सध्या मोठ्या आर्थिक ताणाचा सामना करावा लागत आहे.

सध्या किती टॅक्स आकारणी?

सध्या 3 ते 15 लाख रुपयांदरम्यान वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 5 ते 20 टक्के दराने टॅक्स द्यावा लागतो, तर 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांवर 30 टक्के टॅक्स आकारला जातो. मात्र, सरकारने यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात या टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. अद्याप या सवलतीचा नेमका आकार ठरविण्यात आलेला नाही.

केंद्रीय अर्थसंकल्पात निर्णयाची अपेक्षा

केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. त्याआधी टॅक्स सवलतीवर निर्णय होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर अर्थ मंत्रालयाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, मध्यमवर्गीयांशी संबंधित विविध गट सातत्याने कर सवलतीची मागणी करत आहेत.

सरकारचा प्रतिसाद

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. एका युझरने कर सवलतीची विनंती करताना पोस्टमध्ये म्हटले होते की, “मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी कृपया विचार करा.” यावर उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार लोकांचे मत समजून घेते आणि त्यांच्या सूचनांना प्राधान्य देते. तुमच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद.”

मध्यमवर्गीयांसाठी सकारात्मक बदल?

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या दहा वर्षांत मध्यमवर्गाच्या कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, 2014 मध्ये 10 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या करदात्यांवरील कर वसुलीचा हिस्सा 10.17 टक्के होता, जो 2024 मध्ये घटून 6.22 टक्क्यांवर आला आहे.

देशभरातील करदाते आता 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसले आहेत. टॅक्स सवलतीच्या घोषणेमुळे लाखो करदात्यांना महत्त्वाचा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Spread the love

You may have missed