पुणे: ड्रेनेज फुटल्याने परिसरात दुर्गंधी, शाळेजवळील कचरा कुंडी आरोग्यास धोका – जेष्ठ नागरिक रमेश खामकर यांची महापालिकेकडे तक्रार

पुणे, प्रतिनिधी – पुणे नारायण पेठेतील कै.गोगटे प्रशालाच्या परिसरात गेल्या चार दिवसांपासून ड्रेनेज लाईन फुटून सतत पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत जेष्ठ नागरिक रमेश खामकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ कार्यवाहीसाठी लेखी तक्रार केली आहे.
पहा व्हिडिओ

खामकर यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे की, के. वा. ब. गोरटे प्राथमिक विद्यालयाजवळील कचरा कुंडी अन्यत्र हलवण्यात यावी, कारण शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ साचलेला कचरा आणि सांडपाण्यामुळे विद्यार्थी तसेच पालक त्रस्त झाले आहेत. कचऱ्यामुळे आरोग्यास गंभीर धोके संभवतात, अशी तक्रार त्यांनी केली आहे.
विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय व सावरकर भवनच्या मुख्य खात्याच्या हद्दीत ही समस्या असून, गेल्या पाच दिवसांपासून नागरिकांना घाण पाण्यातून नाक बंद करून जावे लागत आहे. रमेश खामकर यांनी ईमेलद्वारे पालिकेला ही बाब कळवताच, एका तासाच्या आत संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून परिसराची साफसफाई केली आणि त्याचे छायाचित्रही त्यांना पाठवले.
या सकारात्मक प्रतिसादाबद्दल खामकर यांनी महापालिकेचे आभार मानले असून, स्मार्ट पुणे अंतर्गत प्रशासन जलदगतीने कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच, त्यांनी इतर पुणेकरांनाही आवाहन केले आहे की, आपल्या भागातील अडचणींची माहिती ईमेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिकेला द्यावी, कारण योग्य वेळेत दखल घेऊन कार्यवाही केली जात आहे.
निष्कर्षतः, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि महापालिकेच्या तत्परतेमुळे एक गंभीर समस्या काही तासांतच निकाली निघाली, मात्र अशा समस्या पुन्हा उद्भवू नयेत यासाठी स्थानिक यंत्रणांनी नियमित तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.