पुणे: येरवड्यातील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई, नागपूर कारागृहात रवानगी

32465b6d-4cae-4b62-976d-48df94d9512f.jpg

पुणे – येरवडा परिसरातील सराईत गुन्हेगार प्रफुल्ल ऊर्फ गुड्ड्या गणेश कसबे (वय २३, रा. भिमज्योत मित्रमंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. कसबे याच्यावर यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे दाखल असून, त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारच्या कारवाईकडे दुर्लक्ष करून तो सतत गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय होता.

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तो धारदार शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापती करणे, नागरिकांना धमक्या देणे व परिसरात दहशत निर्माण करणे अशा गुन्ह्यांमध्ये गुंतलेला होता. त्याच्या या कृतींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला.

सदर प्रस्तावाची सखोल तपासणी केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी एमपीडीए कायदा १९८१ कलम ३ (२) नुसार कसबे याला एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी त्याला १९ फेब्रुवारी रोजी अटक करून नागपूर जिल्हा कारागृहात रवानगी केली.

गुन्हेगारी नियंत्रणासाठी कठोर पावले
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअंतर्गत शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.

या महत्त्वपूर्ण कारवाईत पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर व निगराणी पथकाचे पोलीस अधिकारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

पोलीस प्रशासनाने ही कारवाई केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पुढील काळात अशा सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Spread the love