९०० रुपये भरले,तरी रक्त तपासणी अधुरीच! ‘उशीर झाला’ म्हणत रुग्णाचा रक्ताचा नमुना नाकारला;

0

वारजे, पुणे,२१ऑगस्ट:महापालिका दवाखाना म्हटले की सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा मिळणे अपेक्षित असते. मात्र,…

Spread the love
late-pruthak-barate-diapencery-gov-hospital-malwadi-pune-hospitals-gm6xz0hmil

वारजे, पुणे,२१ऑगस्ट:महापालिका दवाखाना म्हटले की सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी आणि सुलभ आरोग्यसेवा मिळणे अपेक्षित असते. मात्र, पुणे महापालिकेच्या वारजे येथील पृथक बराटे हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी गेलेल्या दाम्पत्याला रक्त व लघवी तपासणीसाठी तब्बल ९०० रुपये भरावे लागले आणि पैसे भरूनही तपासणी पूर्ण न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आजारी असल्याने पती-पत्नी दोघेही दवाखान्यात तपासणीसाठी गेले होते. डॉक्टरांनी तपासणीनंतर औषधे देतानाच काही रक्त व लघवीच्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोन्ही रुग्णांनी संबंधित पॅथॉलॉजी तपासणीसाठी प्रत्येकी ४५० रुपये भरले.
सकाळी सुमारे १० वाजता जेवणापूर्वी रक्त व लघवीचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर जेवण केल्यानंतर पुन्हा रक्ताचा नमुना देण्यासाठी दवाखान्यात येण्यास सांगण्यात आले. त्यानुसार रुग्ण दुपारी सुमारे ३.४० वाजता रक्ताचा नमुना देण्यासाठी दवाखान्यात परतला.
मात्र, संबंधित खासगी पॅथॉलॉजी संस्थेच्या महिला कर्मचाऱ्याकडे नमुना देण्यासाठी गेल्यानंतर ‘आता उशीर झाला आहे, नमुना घेता येणार नाही’ असे सांगण्यात आले. रुग्णाने विनंती करूनही रक्ताचा नमुना घेण्यात आला नाही. या प्रकारावरून रुग्ण आणि संबंधित कर्मचाऱ्यामध्ये शाब्दिक वादही झाला.
पैसे भरूनही तपासणी अपूर्ण; जबाबदारी कोणाची?
जेवणापूर्वी आणि जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. त्यामुळे जेवणानंतर रक्ताचा नमुना ठरावीक वेळेत घेणे आवश्यक असू शकते. मात्र, रुग्णाला नमुना देण्यासाठी नेमकी किती वेळेची मर्यादा आहे, हे स्पष्टपणे सांगण्यात आले होते का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णाला जेवणानंतर पुन्हा दवाखान्यात येण्यास सांगण्यात आले आणि त्यानुसार तो दुपारी दवाखान्यात आलाही. मात्र, नमुना घेण्यास नकार मिळाल्याने तपासणी अपूर्ण राहिली.
महापालिका दवाखान्यात रक्त-लघवी तपासणी सशुल्क का?
या घटनेमुळे केवळ एका रुग्णाच्या तपासणीचा प्रश्न निर्माण झालेला नसून महापालिका दवाखान्यातील सशुल्क पॅथॉलॉजी सेवाही चर्चेत आली आहे.
महापालिका दवाखान्यात मूलभूत रक्त व लघवी तपासणीसाठी रुग्णांकडून शुल्क आकारले जात असेल, तर त्यामागील नियम काय आहेत? खासगी पॅथॉलॉजी संस्थेमार्फत सेवा दिली जात असल्यास तिच्यावर महापालिकेचे नियंत्रण आणि देखरेख किती आहे? रुग्णांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना पूर्ण तपासणी सेवा मिळण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?
महापालिका प्रशासन उत्तर देणार का?
सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी महापालिका दवाखान्यावर विश्वास ठेवून येतात. त्यामुळे तपासणीसाठी शुल्क आकारले जात असेल, तर तपासणीची वेळ, नियम आणि नमुना स्वीकारण्याची अंतिम मर्यादा रुग्णांना स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे.
पैसे भरूनही तपासणी पूर्ण झाली नाही, तर रुग्णाने पुन्हा पैसे भरायचे का? ‘उशीर झाला’ हे कारण देण्यापूर्वी रुग्णाला वेळेची स्पष्ट माहिती देण्यात आली होती का? आणि महापालिका दवाखान्यात खासगी पॅथॉलॉजीच्या सेवांवर नियंत्रण कोणाचे?
या संपूर्ण प्रकाराची पुणे महापालिका आरोग्य विभागाने चौकशी करून रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या तपासणी शुल्कासह पॅथॉलॉजी सेवेच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्टता द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com
मो. ८३७८९५७६७४

Spread the love

Leave a Reply

You may have missed