अमली पदार्थ विक्रेत्याकडून हप्ता घेताना पोलीस शिपाई रंगेहात ताब्यात

bribe-7-s_202209878786.jpg

वसई : अमली पदार्थ विक्रेत्यांना संरक्षण देण्यासाठी तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विठ्ठल सागळे (वय ३४) याने दरमहा ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. शुक्रवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला पानटपरी विक्रेता आदर्श गुप्ता याच्या मार्फत लाच घेताना रंगेहात अटक केली.

अमली पदार्थ विक्रीला संरक्षणाचा धक्कादायक प्रकार
तक्रारदार एमडी (मॅफेड्रॉन) नावाचा अमली पदार्थ विकतो. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा व्यवसाय सुरू ठेवायचा असल्यास दरमहा ५० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी धमकी पोलीस शिपाई विठ्ठल सागळे याने दिली होती. तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

सापळा आणि अटक
तक्रारीच्या पडताळणीत लाच मागणीची पुष्टी झाल्यानंतर शुक्रवारी रात्री सापळा रचण्यात आला. पानटपरी विक्रेता आदर्श गुप्ता याच्या माध्यमातून ५० हजारांची लाच घेताना विठ्ठल सागळे आणि गुप्ता यांना रंगेहात पकडण्यात आले.

कारवाईची टीम
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे, पोलीस हवालदार योगेंद्र परदेशी, महिला पोलीस हवालदार शमीम शेख, बर्गे आदींच्या पथकाने केली.

पोलीस दलाची प्रतिमा मलीन
वसई-विरार शहरात अमली पदार्थांचे प्रमाण वाढत असताना पोलिसांकडूनच संरक्षण मिळत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात विठ्ठल सागळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Spread the love