रस्त्यालगत जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांचा धडाका; चार महिन्यांत ७३ कारवाया

4_1643190271.jpg

पिंपरी (ता. १५): शहरातील सार्वजनिक ठिकाणी उघडपणे पत्त्यांचे डाव रंगवत जुगार खेळणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मागील चार महिन्यांत शहरातील विविध भागांतून एकूण ७३ जुगार अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील रस्त्यांवरील दुभाजक, उद्याने आणि मोकळ्या जागांमध्ये दहा-बारा जणांचे टोळके गोळा होऊन तासन्‌तास पत्यांचे डाव रंगवत असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनास आले. अशा ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत करत सातत्याने छापेमारी केली आहे.

वाद व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
जुगार खेळताना अनेक वेळा जुगाऱ्यांमध्येच वाद होऊन हे वाद टोकाला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही प्रकरणांमध्ये एकमेकांच्या जीवावर उठण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जुगाराबरोबरच अशांततेचे सावटही शहरावर गडद होत होते.

आर्थिक नुकसान आणि कुटुंबांची वाताहत
कष्टाने मिळवलेला पैसा जुगारात घालविणाऱ्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडते. भविष्यासाठीची तरतूद, घरखर्च यावर विपरीत परिणाम होतो. अनेक घरांमध्ये त्यामुळे वैफल्य, तणाव आणि कलहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा
“जुगार खेळणाऱ्यांवर आमची बारीक नजर आहे. कुठेही जुगार सुरू असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. रीतसर कारवाई केली जाईल,” असे आवाहन सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांनी केले.

नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची
“रस्त्यालगतच काही ठिकाणी उघडपणे जुगार खेळला जातो. गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्यांसह सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ केली जातात. पोलिसांनी अधिक कठोर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिक सुनील राजेभोसले यांनी केली.

या वर्षातील जुगारविरोधी कारवाया
| महिना | कारवाया |
|——–|———–|
| जानेवारी | २४ |
| फेब्रुवारी | ०९ |
| मार्च | १९ |
| एप्रिल | २१ |
| एकूण | ७३ |

पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील जुगार अड्ड्यांवर आळा बसण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच अशा सामाजिक समस्यांना रोखता येईल, असे स्पष्ट चित्र उभे राहत आहे.

Spread the love