पुण्यात मोठा आर्थिक घोटाळा उघड; दीपक मानकर, शंतनू कुकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, प्रतिनिधी: बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपी शंतनू कुकडे याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार लपविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका मानकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मानकर (६७), शंतनू कुकडे (५३) आणि रौनक जैन (३८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शंतनू कुकडे याच्यावर विदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे, ज्यामध्ये त्याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली होती.
कुकडेच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. या रकमांपैकी पावणेदोन कोटी रुपये त्याचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या खात्यातून दीपक मानकर व त्यांच्या पुत्राच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मानकर यांची चौकशी देखील केली होती.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांनी आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांना पत्र पाठवले आहे. यानंतर कुकडेच्या बँक खात्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार आहे.
कुकडेच्या नावावर असलेल्या चेन्नईतील कंपनीच्या शेअर्समार्फत हे पैसे आल्याचे सांगण्यात आले असले तरी व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे पुणे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.