पुण्यात मुसळधार पावसाचा कहर; तीन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याने वाहतूक कोलमडली

n6650982581747750714764fdbdff78b01e3bf4f9ec27594f6a1efe368652b3d5a5554a9e6defffb5dfed8b.jpg

पुणे, २० मे: गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी मोठे होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी परिसरात भर चौकात एक मोठे होर्डिंग कोसळले. या घटनेत सात ते आठ दुचाकी अडकल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान, घटनास्थळी आपत्कालीन सेवा आणि महानगरपालिकेचे पथक दाखल होऊन होर्डिंग हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पहा व्हिडिओ

फुरसुंगी येथील मंतरवाडी चौक आणि सणसवाडी या भागांतही पावसामुळे मोठ्या होर्डिंग्ज कोसळल्याच्या घटना घडल्या. या भागात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे आणि होर्डिंग्ज आडवे झाल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. परिणामी, अनेक रस्त्यांवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

महापालिका प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केलं असून, अडथळे दूर करून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वीच अशा घटना घडणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.

शहरातील बेकायदेशीर किंवा कमकुवत होर्डिंग्जबाबत तपासणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या बाबतीत गंभीर भूमिका घेऊन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.


Spread the love

You may have missed