‘ससून’मधील बेवारस रुग्ण गायब प्रकरण : “वरिष्ठांवर कारवाई करावी”; व्हील चेअरवर उपोषण – Sassoon Hospital Pune

448-252-22163857-thumbnail-16x9-sassoon-hospital-hunger-strike.jpg

Sassoon Hospital Pune : पुणे शहरातील ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी बेवारस रुग्णावर उपचार न करता त्यांना ससूनमधील डॉक्टरांकडून निर्जनस्थळी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात एका डॉक्टरला निलंबित करण्यात आलं. या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अधीक्षक यलप्पा जाधव व अधिष्ठाता एकनाथ पवार यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय.

व्हील चेअरवर उपोषण : मागील पाच दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून ससून रुग्णालयाच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या व्हील चेअरवर उपोषण सुरू करण्यात आलंय. या उपोषणाचा आजचा (9 ऑगस्ट) पाचवा दिवस आहे.

बेवारस रुग्णांची माहिती द्यावी : “ससून रुग्णालयामधील डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांवर पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पण या प्रकरणात अधीक्षक यलप्पा जाधव व अधिष्ठाता एकनाथ पवार यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल करावा. तसेच आम्ही जे 80 बेवारस रुग्ण रुग्णालयात दाखल केले आहेत, त्यांचं काय झालं? त्यांना कुठे सोडण्यात आलं? याची माहिती द्यावी. त्यानंतरच उपोषण सोडणार आहे,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी घेतली.

विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू : “बेवारस रुग्ण रुग्णालयामधून बाहेर सोडल्या प्रकरणात एका डॉक्टरावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई फक्त नावापुरती आहे. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यातील डॉक्टर बारटक्के, अधीक्षक यल्लाप्पा जाधव, अधिष्ठाता एकनाथ पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा. त्याचबरोबर सरकारी पदाचा गैरवापर त्यांनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ज्या डॉक्टरांनी बेवारस रुग्ण बाहेर सोडले, त्या डॉक्टरांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा,” अशी मागणी दादासाहेब गायकवाड यांनी केली.

अधीक्षकांना पदमुक्त करा : “प्रकरणामध्ये कलम वाढ करून अपहरण, सदोष मनुष्यवध तसंच खुनाचा प्रयत्न, सरकारी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावे, शासन निर्णयानुसार वैद्यकीय अधीक्षक पद हे प्राध्यापक सवर्गातून भरण्यात येतं. मात्र, हे पद उपप्राध्यापक असलेल्या यल्लपा जाधव यांना देण्यात आलं. यामुळं त्यांना तत्काळ वैद्यकीय अधीक्षक पदावरून पदमुक्त करण्यात यावं,” अशी मागणी यावेळी दादासाहेब गायकवाड यांनी केली.

Spread the love

You may have missed