पुण्यात कोरोनाचा प्रकोप वाढला; राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यातच

पुणे – देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण सध्या पुण्यात असल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ६५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे २५ रुग्ण हे पुणे महानगरपालिकेअंतर्गत आहेत. याशिवाय मुंबईत २२, ठाण्यात ९, पिंपरी चिंचवडमध्ये ६, कोल्हापूरमध्ये २ आणि नागपुरात १ नवीन रुग्ण आढळून आला आहे.
राज्यात १ जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण ११,५०१ चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ८१४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या राज्यात एकूण ५०६ सक्रिय कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ३०० हून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात कोल्हापूरमधील एका महिलेचा आणि वसईतील एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे दुर्दैवी वृत्त समोर आले आहे.
देशात पुन्हा वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही खबरदारीचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, केंद्र कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. तसेच सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी मास्कचा वापर, हात धुणे आणि सामाजिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. पुणेकरांनी विशेषतः भीडभाड असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे आणि लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.