नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत विनापरवाना मंगल कार्यालये व लॉजचा सुळसुळाट; ‘महाराष्ट्र माझा’च्या पाहणीत धक्कादायक वास्तव उघड
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड (वडगावशेरी) क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक मंगल कार्यालये, सभागृहे आणि लॉजचा व्यवसाय आवश्यक वैध परवान्याशिवाय व नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे ‘महाराष्ट्र माझा’च्या पाहणीत आढळून आले आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात लेखी निवेदन अर्जाद्वारे पाठपुरावा करून तब्बल ८ महिने उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून अद्याप लेखी स्वरूपात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
रियाज मोहिदीन शेख (रा. वारजे, पुणे) यांनी येरवडा येथील नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांकडे यासंदर्भात लेखी निवेदन दिले होते. माहिती अधिकाराखाली (RTI) मिळालेल्या माहितीच्या आधारे हा प्रकार उघडकीस आला असून, संबंधित कागदपत्रांची प्रतही निवेदनासोबत जोडण्यात आली आहे.
‘महाराष्ट्र माझा’च्या पाहणीत समोर आलेले
धक्कादायक मुद्दे:
नियमांना केराची टोपली: महानगरपालिका अधिनियम कायद्यानुसार सदर व्यवसाय सुरू करण्यासाठी महापालिकेकडून विविध परवानग्या व परवाना घेणे बंधनकारक आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षितता आणि अग्निसुरक्षा (Fire Safety) तपासणी करणे अनिवार्य असते. परंतु, या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही.
मुदतबाह्य व विनापरवाना व्यवसाय: सन २०२५ ते २०२६ या कालावधीत अनेक परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण केले नसतानाही, तसेच काही ठिकाणी आवश्यक वैध परवाना नसतानाही त्यांचे व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. काही ठिकाणी बार आणि खाद्यसेवा परवान्यांच्या नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
वरिष्ठांच्या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता: वरिष्ठ स्तरावरून याबाबत वारंवार आदेश व सूचना निघतात, परंतु क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्राथमिक पातळीवर त्यांच्या अंमलबजावणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.
आरोग्य विभागाची उदासीनता: क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांनी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांना आदेश, सूचना आणि विनंत्या करूनही या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक स्तरावर याबाबत अतिशय उदासीनता आढळून येत असून, वरिष्ठांच्या सूचनांची अंमलबजावणी का होत नाही, हे न उलगडणारे कोडे बनले आहे.
प्रमुख मागण्या:
या गंभीर प्रकाराची दखल घेऊन नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्व मंगल कार्यालये, सभागृहे व लॉजची सखोल चौकशी करावी. परवाना नसलेली किंवा मुदत संपलेल्या परवान्यांवर सुरू असलेली आस्थापने त्वरित बंद करून त्यांच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. यासोबतच, आठ महिने उलटूनही या प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या व वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्यात यावी.