विनापरवाना गॅस साठ्याच्या तक्रारीवर महापालिकेचे मौन! ८ दिवसांत माहिती देण्याचे आवाहन; सहा महिन्यांनंतरही तक्रारदाराला लेखी-तोंडी उत्तर नाही
पुणे : महाराष्ट्र माझा न्युज – पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅसच्या सिलिंडरचा विनापरवाना व अवैध साठा करून व्यवसाय सुरू असल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारीकडे महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. रियाज मोहिदीन शेख यांनी ६ मार्च २०२६ रोजी विभागाच्या उपायुक्तांकडे तक्रार अर्ज करून अशा ठिकाणांची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, १५ सप्टेंबर उजाडला तरी या तक्रारीवर कोणतीही लेखी अथवा तोंडी माहिती देण्यात आलेली नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
दाट लोकवस्तीच्या परिसरात आवश्यक परवानगीशिवाय गॅस सिलिंडरचा साठा केला जात असल्यास नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अशा व्यवसायांमुळे महापालिकेचा महसूल बुडत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता. तक्रारीची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल आठ दिवसांत कळवावा, अशी मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, दप्तर दिरंगाईच्या तरतुदींनुसार सात दिवसांत कार्यवाहीची स्थिती स्पष्ट करण्याची मागणीही करण्यात आली होती.
मात्र, तक्रारीनंतर तब्बल सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही संबंधित विभागाकडून साधी कार्यवाहीची माहितीही मिळाली नसल्याने ‘तक्रार करा आणि फाईल दप्तरातच धूळ खात ठेवा’ अशी अवस्था निर्माण झाली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. गॅस साठ्यासारख्या संवेदनशील विषयावरील तक्रारीकडेही महापालिका प्रशासन एवढे दीर्घकाळ दुर्लक्ष करणार असेल, तर नागरिकांनी सुरक्षिततेसाठी नेमके दार ठोठवायचे तरी कोणते, असा प्रश्न तक्रारदाराने उपस्थित केला आहे.