पावसाळी लोखंडी चेंबरच्या झाकणात अडकला तरुणाचा पाय; वारजे जकात नाक्यावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Oplus_16908288
पुणे : वारजे जकात नाका परिसरात पावसाळी लोखंडी चेंबरच्या झाकणात एका तरुणाचा पाय अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाय झाकणातून बाहेर काढण्यासाठी अखेर चक्क लोखंडी झाकण कापावे लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या पावसाळी चेंबरच्या झाकणाची अवस्था नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप आहे. चेंबरच्या झाकणातील रचना, तुटलेले किंवा धोकादायक भाग याकडे वेळेत लक्ष न दिल्यास पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
या घटनेमुळे महापालिकेच्या पावसाळी चेंबर आणि रस्त्यावरील लोखंडी झाकणांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एखाद्या नागरिकाचा पाय अडकून त्याची सुटका करण्यासाठी चक्क झाकण कापावे लागते, ही परिस्थिती संबंधित यंत्रणेसाठी गंभीर इशारा मानला जात आहे.
संबंधित ठिकाणी यापूर्वी तक्रारी अथवा दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती का? असल्यास त्यावर वेळेत कार्यवाही का झाली नाही? धोकादायक चेंबरची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
घटना घडल्यानंतरच उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य धोके आधीच ओळखून ते दूर करण्याची जबाबदारी प्रशासनाची नाही का? असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि संबंधित महापालिका विभागाने या घटनेची दखल घेऊन परिसरातील पावसाळी लोखंडी चेंबरची तातडीने पाहणी करावी, धोकादायक झाकणे दुरुस्त अथवा सुरक्षित करावीत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एका तरुणाचा पाय चेंबरमध्ये अडकला; सुटकेसाठी लोखंड कापावे लागले. आता प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?
— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४


