प्रयेजा सिटी रस्त्यावरील नालेसफाई प्रकरण; कनिष्ठ अभियंत्यांची प्रतिक्रिया, मात्र प्रत्यक्ष पाहणीबाबत मौन,प्रत्यक्ष पाहणीऐवजी जुने फोटोच आधार? खात्री करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी कधी?
पुणे | दि. ४ जुलै २०२६ : सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रयेजा सिटी रस्त्यावरील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणी गाळ, कचरा, माती, दगड तसेच राडारोडा साचलेला आढळून आल्याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्यांकडे प्रतिक्रिया मागविण्यात आली.
यावेळी कनिष्ठ अभियंत्यांनी “ऑफिसला येऊन बोला, उपअभियंत्यांना भेटून बोला,” अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅपवर एप्रिल महिन्यात नालेसफाई केल्याचे फोटो तसेच नालेसफाई पूर्ण झाल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे पाठवली.
मात्र, प्रत्यक्ष पाहणीत ज्या ठिकाणी गाळ, कचरा आणि राडारोडा आढळून आला, त्या संदर्भात त्यांनी “त्या ठिकाणी NHAI कडून रिटेनिंग वॉलचे काम सुरू आहे. त्यातील राडारोडा कदाचित नाल्यात पडला असेल,” असा अंदाज व्यक्त करणारा व्हॉट्सअॅप संदेश पाठवला.
परंतु, “मी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करतो,” “नाल्यात राडारोडा पडत असल्याची खात्री करून घेतो,” “NHAI ला याबाबत सूचना देतो,” किंवा “आवश्यक ती कार्यवाही करतो,” अशी कोणतीही स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली नाही. तसेच, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करतील, असे आश्वासनही देण्यात आलेले नाही.
यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आलेल्या सद्यस्थितीची खात्री करण्याऐवजी एप्रिल महिन्यातील जुने फोटो आणि वर्तमानपत्रातील कात्रणांचाच आधार का दिला जात आहे? जर प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असेल, तर तिची खातरजमा करण्यासाठी संबंधित अधिकारी घटनास्थळी कधी जाणार?
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, आज नाल्यात गाळ, कचरा आणि राडारोडा स्पष्टपणे दिसत असताना काही महिन्यांपूर्वीच्या साफसफाईचे फोटो पाठविल्याने सध्याची समस्या दूर होत नाही. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासणे आणि आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
जर NHAI च्या कामामुळे नाल्यात राडारोडा पडत असेल, तर त्याबाबत संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून तो तातडीने हटविण्याची जबाबदारी कोणाची? याचेही स्पष्ट उत्तर प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही.
पावसाळा सुरू असताना कागदोपत्री दावे, जुने फोटो किंवा वर्तमानपत्रातील कात्रणांपेक्षा प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून त्वरित कार्यवाही करणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


— रियाज मोहिदीन शेख
संपादक / पत्रकार
Maharashtra Majha Online
https://maharashtramajhaonline.com�
मो. ८३७८९५७६७४