येरवडा-धानोरीतील मंगल कार्यालयांच्या परवाना प्रक्रियेवर संशय; तक्रारीनंतरही चार महिन्यांपासून माहिती नाही

0
pudhari_import_wp-content_uploads_2022_07_WhatsApp-Image-2022-07-27-at-3.26.21-PM (1)

पुणे : महाराष्ट्र माझा न्युज येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मंगल कार्यालये, बँक्वेट हॉल आणि लॉज यांच्या परवाना प्रक्रियेत अनियमितता होत असल्याचा आरोप करत करण्यात आलेल्या तक्रारीवर अद्यापही ठोस कारवाईची माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

रियाज मोहिदीन शेख यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली होती. या तक्रारीत क्षेत्रातील काही मंगल कार्यालये, बँक्वेट हॉल आणि लॉज आवश्यक वैध परवाना नसतानाही सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

तक्रारीनुसार, काही आस्थापनांकडून परवाना मंजुरी आणि नूतनीकरणाच्या अटींचे उल्लंघन होत असून सन २०२५ ते २०२६ या कालावधीत अनेक परवानाधारकांनी परवाना नूतनीकरण न करताही व्यवसाय सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच परवाना मंजुरी देताना आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर निकष आणि नियमावलींची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नियमभंग करणाऱ्या आस्थापनांवर आवश्यक दंडात्मक कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, बँक्वेट हॉल आणि लॉज यांची सखोल चौकशी करून परवाना नसलेल्या अथवा मुदत संपलेल्या परवान्यावर सुरू असलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणाबाबत विचारणा केल्यानंतर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ उजवनकर यांनी, “वरिष्ठ निरीक्षकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे संबंधितांना लेखी मेमो देण्यात आला असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली आहे,” असे सांगितल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे.

मात्र, तक्रार दाखल होऊन चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही २३ जून २०२६ पर्यंत तक्रारदाराला कोणत्याही प्रकारची लेखी माहिती अथवा चौकशीचा अहवाल देण्यात आलेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारीवरील चौकशी नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत माहिती देण्याची आणि संबंधित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणामुळे परवाना प्रक्रियेतील पारदर्शकता, नियमांची अंमलबजावणी आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

“या प्रकरणाचा पाठपुरावा करताना  येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक आणि संबंधित कर्मचारी कारवाई तसेच माहिती देण्याबाबत कशी टाळाटाळ करतात, याचा सविस्तर पर्दाफाश आमच्या पुढील मालिकेत करण्यात येणार आहे.”

Spread the love

Leave a Reply

You may have missed